Pune District : पुणे-सातारा रस्ता ठरतोय वाहतुकीस असुरक्षित

कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत दुतर्फा सर्व्हिस मार्गावरील व्यावसायिकांनी रस्ता दुभाजक तोडले आहेत. त्यामधील बहुतांश धोकादायक स्थितीत आहेत. विशेष म्हणजे ज्याठिकाणी दुभाजक तोडले आहेत.
त्याठिकाणी महामार्गावर नैसर्गिक पावसाचे पाणी वाहण्यासाठी तयार करण्यात आलेली गटारे राजरोसपणे बुजवून पाण्याला अडथळा निर्माण केला आहे.दुभाजक तोडण्यासाठी प्रशासनाचा ‘ना हरकत दाखला’ घेत नाहीत.या ठिकाणी वाहने अचानक मुख्य मार्गावर येऊन अपघात होत आहेत.त्यामुळे महामार्ग वाहतूकीस धोकादायक झाला आहे.
कात्रज शिंदेवाडी ते सारोळा या महामार्गाच्या ३५ किलोमीटरच्या अंतरात महामार्गालगत शेकडो व्यावसायिक यांनी जागोजागी दुभाजक तोडले आहेत. याठिकाणी गटारात माती, मुरुम टाकून खड्डे बुजवून घेतले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचून दुचाकीस्वार तसेच चार चाकीच्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता आहे.
दुचाकीचालकांच्या तोंडावर रस्त्यावरील पाणी उडून अपघात होताना दिसत असून या दुरवस्थेकडे व्यावसायिक तसेच प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. या बाबत संबंधित व्यावसायिकांना प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल अशी केवळ नोटीस देऊन कारवाईचा फार्स दाखवला जात आहे. गेली अनेक वर्षे तोडलेली दुभाजक बंद करण्यात आली नाहीत.
ती तातडीने बंद करून पुन्हा दुभाजक तोंडन्यावर कडक कारवाईचा बडगा उगारण गरजेचे आहे. व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप नागरिक व प्रवाशांनी केला आहे.





