Pune District : भिंतचित्रणाद्वारे कचरा वर्गीकरणाची जनजागृती

माळेगाव : माळेगाव बुद्रुक, पोलीस स्टेशन परिसरात कचरा वर्गीकरणावर शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भिंतचित्रणाद्वारे जनजागृती केली.
स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्याच्या एमबीए विभागातील विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी भिंतचित्रणाचा उपक्रम राबविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भिंतींवर कचरा वर्गीकरणाच्या महत्त्वाबाबत आकर्षक चित्रे व संदेश रेखाटले.
यामध्ये ओला व सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, सॅनिटरी कचरा वेगवेगळ्या प्रकारे कसा वर्गीकृत करावा याबाबत माहिती दिली गेली. या भिंतचित्रांद्वारे कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एमबीए कॉलेजचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. वंदना शिंदे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
संस्थेचे संचालक, प्राध्यापक, आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर पिसाळ म्हणाले की विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील प्रयत्नामुळे परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
एमबीए इन्स्टिट्युटच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भविष्यातही असे उपक्रम राबवून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येईल.





