पुणे जिल्हा : न्यायालयात नियमित बंदुकधारी पोलीस द्या

शिरूर पोलिसांकडून मागणी
शिरूर – शिरूर न्यायालयाचा आवारात शिविगाळ, हाणामारी, शिरूर न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर असे वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन शिरूर न्यायालयाने शिरूर पोलीस स्टेशनला सुरक्षेसाठी नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी शिरूर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबारामध्ये एक महिला ठार झाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या आवारात दारू पिऊन शिवीगाळ, मित्र मैत्रिणीमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला नव्हता. दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्याला समज देऊन सोडण्यात आले.
मैत्रिणीने मारणाऱ्या मित्रावर तक्रार देण्यास नकार दिला होता. परंतू सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या घटना चुकीच्या वाटत असल्याने दैनिक प्रभातने याबाबत सडेतोड वृत्त दिले होते.
या घटना निर्भिडपणे प्रकाशात आणल्या होत्या. याची दखल घेत न्यायालयाने बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिरुर न्यायालयात बंदुकधारी पोलीस नियमितपणे हजर राहणार आहे. दै. ‘प्रभात ‘च्या वृत्तांकनाचे वकील असोसिएशन संघटनेने आभार मानले आहेत.





