Pune District : गोरगरीबांना दर्जेदार, सवलतीत आरोग्य सेवा द्या

आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
आरोग्यसेवेसाठी आमदार कुल यांचा सातत्य
पारगाव : गोरगरीब जनतेला दर्जेदार, मोफत व सवलतीच्या दरात आरोग्य सेवा मिळावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. दरम्यान, आरोग्यसेवेसाठी आमदार कुल यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कुल यांच्या प्रश्नांवर आरोग्य राज्यमंत्री जैस्वाल यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
पावसाळी अधिवेशन २०२५ दरम्यान आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत लक्षवेधी चर्चा उपस्थित केली होती.
आमदार कुल म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये लागू करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. योजनेतील उपचारांचे दर वाढविण्यात यावेत, धर्मादाय रुग्णालये व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचे दर, धर्मादाय रुग्णालयातील उपचाराचे महत्तम दर शासनाने ठरवावेत. त्यामध्ये हस्तक्षेप करावा,
धर्मादाय योजनेत उपचार करीत असताना औषधांचा समावेश करावा, अनेक रुग्णालये शासकीय योजनेचा लाभ घेतात. परंतु रुग्णांना मदत दिली जात नाही. अशा रुग्णालयांबाबत निर्णय घेऊन त्यांना योजनेत समाविष्ट करावे व लाभ न दिल्यास ती रक्कम वसूल करण्यात यावी, रुग्ण सेवक नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यरत असलेल्या सोशल वर्करनी त्वरित मदत देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशा विविध मागण्या आमदार राहुल कुल यांनी यावेळी केल्या.
उपचारांच्या दरांबाबत आदेश देऊ- जैस्वाल
मागण्यांना उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले की, मागील अधिवेशनात विधेयक पारित करण्यात आले असून, त्याअंतर्गत ३३० नवीन रुग्णालयांचा समावेश केला आहे. काही रुग्णालये अद्याप राहिली असल्यास त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना देखील योजनेत समाविष्ट केले जाईल. योजनेतील उपचारांचे दर ठरविण्याबाबत आरोग्य विभागाला आदेश देण्यात येतील. औषधांचे दर समाविष्ट करण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.





