पुणे जिल्हा : राजगुरूनगरात निषेध रॅली

राजगुरूनगर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने देशात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ हुतात्मा राजगुरू महाविद्यालय ते खेड तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
कोलकातामध्ये प्रशिक्षण घेणार्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. बदलापूरमध्ये एका शाळकरी बालिकेवर अत्याचार झाला. कोल्हापूर, अकोल्यातून सुद्धा अशीच घटना समोर आली आहे. देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचार वाढतच चालले आहेत म्हणून अशा घटनांना पायबंद करण्यासाठी कठोर उपाय करण्याची आवश्यकता आहे.
देशातील महिला आणि मुलींवरील वाढते अत्याचार त्वरित रोखले पाहिजे. अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर कडक शिक्षा झाली पाहिजे. पीडितांना वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींवरील अत्याचाराला रोखण्यासाठी जेन्डर सेन्सिटायझेशन कमिटी अगेन्स्ट सेक्सुअल हरासमेंट (जीएस-सीएएसएच) ही समिती कार्यान्वित करावी, अशी एसएफआयने मागणी केली आहे
या रॅलीत एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष दीपक वाळकोळी, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, किसान सभेचे तालुका सचिव अमोद गरूड, एसएफआय आंबेगाव तालुका अध्यक्ष रोहिदास फलके, हरिश धोंगडे, समीर माळी, रोहन ठोंगिरे, प्रतीक्षा गवारी आदींसह विद्यार्थी – विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





