पुणे जिल्हा : उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बारामतीत आंदोलन

प्रहारच्या वतीने पदाधिकारी आक्रमक
बारामती : मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ या योजनेप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना ही प्रति महिना ६ हजार रुपयांचे अनुदान सरकारने सुरू करावे, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी राजकीय आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील शाखेच्या वतीने बारामतीतील सहयोग निवासस्थानासमोर दिव्यांग व्यक्तींनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा अजित पवारांशी संबंधित कोणाचं बोलणं होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे.
शनिवार (दि.५) सकाळी १२ वाजता बारामतीतील भिगवण रस्त्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. सहयोग सोसायटीच्या प्रवेशाद्वारासमोर बसमधून दिव्यांग आंदोलक आले. त्यांनी थेट तिथे ठिय्या मांडला हे आंदोलन होणार होते, याची कुणकुण असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता..
मात्र. आंदोलक आले त्यांनी शांततेने या ठिकाणी ठिय्या मांडला. त्यानंतर मात्र आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. दरम्यान, आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ अमलात आणली.
त्याप्रमाणे दिव्यांगांनाही हे अनुदान द्यावे. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः आमच्याशी संवाद साधल्याशिवाय व आम्हाला आश्वासन दिल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.





