Pune District : जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात निषेध

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्लाविरोधात संताप
लोणी काळभोर – अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला व जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पूर्व हवेलीतील राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनांनी लोणी स्टेशन ते लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्यापर्यंत शांततापुर्ण पध्दतीने पायी लॉंगमार्च दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काढला.
पूर्व हवेलीतील संघटनांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करावी. तसेच जनसुरक्षा कायदा कलम नागरिकांच्या हक्काचे उल्लंघन करणारा असल्यामुळे हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा. पोलीस प्रशासन व सरकारने घटनेतील न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्व हवेलीतील संघटनाच्या वतीने मागणीचे निवेदन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना देण्यात आले. यावेळी सूर्यकांत गवळी, श्रीकांत होवाळ, हनीफ शेख, ॲड श्रीकांत भिसे, बाळासाहेब आवारे, अमोल लोंढे, संदीप शेलार, गणेश तौर, महेश जैनजांगडे, दत्ता कांबळे, संदीप बडेकर, ॲड अनिता गवळी, अनिता गोरे, महेश गायकवाड, अक्षय म्हस्के, अमर भोसले, संजय वाघमारे,आबासाहेब जवळकर, गिरीश चंद, लक्ष्मण चव्हाण, संतोष आडळे, अभिजित पाचकुडवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





