Pune District : प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध

शिरूरमध्ये सर्व संघटना एकत्र : हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी
शिरूर – संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंड, तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोलते, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले,
रूपाली बोर्डे, राधा घेगडे, सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त रामभाऊ इंगळे, प्रा. चंद्रकांत धापटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, काँग्रेस (आय) चे अजीम सय्यद, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मोहम्मद हुसेन पटेल, बबनराव गायकवाड आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवींद्र धनक म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून, अशा घटनांनी महाराष्ट्रातील विचारमंथनाची परंपरा डागळते. दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे.
यावेळी पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, मंगेश खांडरे, विनोद भालेराव, राणी कर्डिले, संजय बारवकर, भास्कर पुंड आदींनी विचार मांडत, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शासनाने गंभीर भूमिका घेतली पाहिजे, अशी जोरदार भूमिका मांडली.
निवेदनात म्हटले आहे की, “विचारांची लढाई ही विचारांनीच व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून सामाजिक परिवर्तन घडवले गेले आहे. अशा विचारवंतांवर हात उचलणे ही समाजविघातक प्रवृत्ती असून ती अजिबात सहन केली जाणार नाही. हल्ल्याचा सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहे, हे शासनाचे अपयश दर्शवते. त्यामुळे अशा असहिष्णु प्रवृत्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करून प्रवीण गायकवाड यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





