पुणे जिल्हा : कोथिंबीरीची जुडी खातेय भाव

नारायणगाव उपबाजारात जुडीला 130 ते 170 रुपये दर
उत्पादक बळीराजाला लॉटरी तर ग्राहकांच्या खिशाला कात्री
नारायणगाव : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस व रिमझिम लावलेली हजेरी यामुळे जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात कोथिंबीरची आवक कमालीची घटली आहे. त्यामुळे कोथिंबीरीच्या एका जुडीला सोन्याचा भाव आला आहे. नारायणगाव बाजारात जुडीला प्रतवारीनुसार 130 ते 170 रुपये दर मिळाल्याने कोथिंबीर उत्पादक बळीराजाला लॉटरी लागली असून ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात मंगळवारी कोथिंबिरीला शेकडा 1351 ते 17001 भाव मिळाला असल्याने शेतकरी समाधानी आहे. भाजीपाल्याची आवक घटली असून चांगल्या मालाला उच्चांकी भाव मिळत असल्याचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती प्रकाश ताजणे यांनी सांगितले. पावसामुळे कोथिंबीर पाणी लागून सडल्याने किरकोळ बाजारातही कोथिंबरी दिसेनासी झाली आहे. अनेक शेतकरी तसेच भाजीपाला व्यवसायदार या पिकाकडे नगदी उत्पन्न मिळणारे पीक म्हणून पाहतात.
जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून ही आवक मंदावली आहे. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोणत्याही पदार्थाची लज्जत वाढवणारी कोथिंबीर सध्या चांगलाच (सोन्याचा) भाव खात असून किरकोळ बाजारात (बाजार समितीतील एका जुडाच्या किरकोळ बाजारात तीन जुड्या केल्या जातात) 100 रुपयांना जुडी विकली जात आहे. त्यामुळे एक जुडी 100 रुपयांना विकणे विक्रेत्यांना परवडत असले तरी गृहिणीचे भाजीपाल्याचे रोजचे बजेट कोलमडले आहे. शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे.
नारायणगाव उपबाजारातील शेकडा भाव (कंसात आवक)
धना 1351 ते 17002 (20 हजार 600 जुड्या), मेथी 1351 ते 4501 (12 हजार 800 जुड्या), शेपू 701 ते 2501 (23 हजार 700 जुड्या). टोमॅटो 150 ते 451 (9 हजार क्रेट)
शेतकर्याला मिळत असलेला बाजारभाव मालाची गुणवत्ता व मागणीवर अवलंबून आहे. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसातही शेतकर्यांनी कोथिंबीर, मेथी आदी भाजीपाला पिकाचे चांगले उत्पादन घेतले आहे. शेतमालाची आवक घटल्याने नारायणगाव उप बाजार गजबजलेला दिसत नाही.
– महेंद्र मेहेर, आडतदार, यश ट्रेडिंग कंपनी





