पुणे जिल्हा : विधानसभा निवडणूक खेडसाठी प्रतिष्ठेची – आमदार मोहिते

तालुक्यात जनसंवाद दौरा, उद्घाटने, भूमिपूजनेे
राजगुरूनगर : विधानससभेची निवडणूक खेड तालुक्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची होणार आहे. या निवडणुकीत काही जण अनेक आमिषे दाखवतील मात्र त्यांच्या या अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौरा व विविध विकासकामांचे उद्घाटन भूमिपूजन या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. 4) वाकी बुद्रुक, काळूस, संतोषनगर, वाकी खुर्द, पिंपरी बुद्रुक या करण्यात आले होते. संतोष नगर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे संचालक जयसिंग भोंगाडे, हनुमंत कड, रणजित गाडे, विलास कातोरे, पस माजी सभापती सुरेश शिंदे, माजी उपसभापती वैशाली जाधव, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयसिंग दरेकर, संतोषनगरचे सरपंच शरद कड, वाकीच्या सरपंच सोनल टोपे, राजगुरूनगर वकील बार संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. सुभाष कड, विलास मांजरे, मोहन कड, प्रशांत कड, दिनेश कड, उमेश कड, नितीन कड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, 20 वर्षे मी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संघर्ष केला. मात्र असे वाटत नव्हते मला त्यांचा प्रचार करावा लागेल. लोकसभेला त्यांच्या सोबत प्रामाणिकपणे काम करीत प्रचार केला. आता ते किती जाण ठेवतील हा त्यांचा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी 50 खोके एकदम ओके म्हणत त्यांना विरोध करीत होतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम करावे लागत आहे. त्यामुळे आपणही गावाच्या विकासासाठी आपसातील मतभेद विसरणे गरजेचे आहे.
गावाच्या विकासासाठी एकजुटीने राहणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी येत्या विधासभेच्या निवडणुकीत मला साथ द्या, असे आवाहन आमदार मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून दिनेश कड यांनी आभार मानले.
या विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन
आमदार मोहिते यांच्या हस्ते वाकी बुद्रुक (4 कोटी 25 लाख ), काळूस (43 कोटी 30 लाख) संतोषनगर ( 5 कोटी 95 लाख)वाकी खुर्द (5 कोटी 64 लाख) पिंपरी बुद्रुक (8 कोटी 64 लाख) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी मोहिते यांनी गावातील व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.





