Pune District : अंड्याचे दर गडगडल्याने पोल्ट्र्री उत्पादक आर्थिक अडचणीत

मंचर : बाजारामध्ये अंड्याचे दर गडगडल्याने अंडी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अंड्याचा उत्पादन होणारा खर्च आणि प्रत्यक्षात विक्रीतून मिळणारे पैसे यामध्ये अंडी उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने अंडी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति अंड्यामागे अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासनाने अंडी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य न केल्यास अंडी उत्पादन करणारे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत येऊन त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे.
ग्रामीण भागात शेतीबरोबरच पोल्ट्री व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात असून अनेक वाडी वस्तीवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठमोठे पोल्ट्री व्यवसाय सुरू केले आहे. या पोल्ट्री व्यवसायात कोंबडी व अंडी व्यवसाय स्वतंत्र केला जात असून सध्या दोन्ही व्यवसायिक अडचणींत आले आहेत. अंडी व्यवसायिक यांच्याकडून अंडे खरेदी करणाऱ्या कंपनीने खरेदी दर कमी केला असून ४ रूपये दराने अंडे खरेदी केली जात आहे. एक अंडी उत्पादनासाठी जवळपास ४ रुपये ५० पैसे खर्च येतो. काही दिवसांपूर्वी थंडीच्या दिवसात ६ रूपये खरेदी दर होता तो २ रुपयांनी कमी झाल्याने कोंबड्यांचा खाद्याचा खर्च करणे देखील अवघड झाले आहे. अंडी पोल्ट्री व्यावसायिकांकडून चार रुपये दराने अंडी खरेदी केली जात आहे. होलसेल विक्रेता ते दुकानदारांना साडेचार ते पाच रुपयाला विकत आहे.
दुकानदार ग्राहकाला सात ते साडेसात रुपयाला विकत आहे. यात होलसेलर व दुकानदार यांना चांगल्या प्रकारे नफा मिळत आहे. मात्र, अंडी उत्पादन करणारा व्यावसायिक मात्र अडचणीत आला आहे.अंड्याची पोल्ट्री तयार करण्यासाठी मोठा खर्च येतो. दहा हजार कोंबड्यांची पोल्ट्री बनवण्यासाठी एक कोटी खर्च येतो. एवढा खर्च करूनही अंड्याला बाजारभाव मिळत नसल्याने अंडी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने पशु खाद्य निर्मितीसाठी आणि लेयर कोंबडी खरेदीसाठी अनुदान दिले पाहिजे, शासनाने मदत करावी.अशी मागणी वैदवाडी येथील अंडी उत्पादक शेतकरी सागर प्रकाश तापकीर यांनी दिली.
अंडी देणारी लेयर कोंबडी खरेदी करावी लागते. तिची किंमत तीनशे रुपये आहे.एका कोंबडीला दिवसाला ११० ते १२० ग्रॅम खाद्य लागते.ती दिवसाला एक अंडे देते. तिच्या एका अंड्याचा उत्पादन खर्च अंदाजे ४ रुपये ५० पैसे असून चार रुपयाला अंडे खरेदी झाल्यास ५० पैशांचा तोटा एका अंड्यामागे सध्या आम्हाला सहन करावा लागत आहे. त्यात उष्णतेमुळे अंडी देणारी कोंबडी दगावली तर मोठे नुकसान होत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे. देशात अंड्याचे मार्केट मोठे आहे. अंड्याच्या मार्केट कमिटीत शासनाचा प्रतिनिधी ठेवून अंड्याचे दर स्थिर कसे राहतील यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.
– मारूती बढेकर, अंडी व्यावसायिक, वैदवाडी





