Pune District :अतिवृष्टीमुळे बटाटा बियाणे घरातच सडण्याची शक्यता

– पेरणी झालेले बियाणे खराब झाल्याने दुबार पेरणीचे संकट
लोणी धामणी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात गेली पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून पेरलेली शेती तर संकटात आहेच. परंतु बटाटा लागवड करण्यासाठी आणलेले बियाणे घरात पडून सडण्याची शक्यता आहे.
काही शेतकऱ्यांनी तर बटाटा बियाणे चिरून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
संपूर्ण मे महिना तसेच जून अर्ध्याच्या वर संपला तरी पाऊस उघडीप घेत नसल्याने प्रचंड मोठे संकट शेतकऱ्यावर ओढवण्याची शक्यता आहे.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी परिसरातील पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज,शिरदाळे सरपंच मनोज तांबे,पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ,धामणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी केली आहे. शिरदाळे परिसरात काही वर्षांपूर्वी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात होत होती.पर्यंत गेल्या काही वर्षात बटाटा लागवड कमी झाली आहे. यंदा देखील ही लागवड घटणार होती. परंतु अनेक शेतकऱ्यांनी बटाटा बियाणे आणून घरात ठेवले आहे.
पंधरा दिवसांपासून बियाणे घरात पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. परंतु सततच्या पावसाने कसलीच शाश्वती नसल्याचे शिरदाळे येथील बटाटा उत्पादक शेतकरी बाबाजी चौधरी,संदीप मिंडे,राघू रणपिसे,बाळासाहेब तांबे,सुरेश तांबे,केरभाऊ तांबे,कांताराम तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पेरणी केलेली सोयाबीन,वाटाणा,मूग,उडीद,मका या पिकांची अवस्था बिकट असून कदाचित दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते असे शिरदाळे उपसरपंच बिपीन चौधरी, माजी उपसरपंच मयुर सरडे गणेश तांबे यांनी सांगितले.
प्रक्रियेमुळे बियाणे खराब होण्याची भीती
गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी बटाटा बियाणे घरात आणून टाकले आहे. काही शेतकऱ्यांनी बियाणे चिरून ठेवले आहे. तर त्यासाठी लागणारे रासायनिक खते देखील आणून ठेवली आहेत. त्यामुळे जसे दिवस जात आहेत, तसे बियाणे सडत असून मोठं नुकसान होत आहे. शेतकरी चिंतेत आहे. पाऊस थांबला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असून पुन्हा पेरणी परवडणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.





