पुणे जिल्हा : ईएसआयसी हॉस्पिटलसाठी सकारात्मक; केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांची ग्वाही

बारामतीच्या शिष्टमंडळाची पुण्यात भेट
बारामती – बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी बारामतीला केंद्र शासन अंतर्गत राज्य कामगार विमा मंडळाचे 200 बेडचे हॉस्पिटल मंजूर करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करू, असे आश्वासन केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिले. पुणे येथे मंत्री यादव यांची बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सदस्य महादेव गायकवाड, उद्योजक अभिजीत शिंदे आदींनी केंद्रीय कामगार मंत्री यादव यांच्याशी चर्चा केली. बारामतीमध्ये ईएसआयसी हॉस्पिटल मंजूर करण्याबाबत प्रस्ताव दिला. राज्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार आयुक्त सुरेश जाधव, भारत फोर्जचे संतोष भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
जामदार म्हणाले की, बारामतीसह तालुक्यात एक लाख कामगार ईएसआयसीकडे नोंदणीकृत आहेत. कामगारांसाठी औद्योगिक कंपन्या व वाणिज्यिक आस्थापना दरमहा ईएसआयसीकडे कोट्यवधी रुपये अंशदान म्हणून जमा करतात. यातून राज्य कामगार विमा मंडळ नियमाप्रमाणे नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना विनाशुल्क दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा मिळणे हक्काचे आहे. परंतु बारामतीच्या शंभर किलोमीटर परिघात राज्य कामगार विमा मंडळाचे हॉस्पिटल नसल्याने कामगार वर्ग हक्काच्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहत आहेत. 2016 पासून ईएसआयसी बारामती परिसरातून विमा शुल्क वसूल करीत आहेत. वैद्यकीय सुविधा मात्र उपलब्ध करत नसल्याने औद्योगिक कंपन्या व कामगारांवर अन्याय होत आहे.
शरद पवार यांच्या दालनात मुद्दा मांडला
ईएसआयसीने बारामतीमध्ये काही खासगी दवाखान्यांशी करार केले आहेत. परंतु लाखोंच्या संख्येतील कामगारांना सुविधा अपुऱ्या पडत आहेत. दवाखान्याच्या सेवांविषयी कामगार असमाधानी आहेत. सर्व बाबींचा अभ्यास करून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने राज्य कामगार विमा मंडळाकडे 200 बेड हॉस्पिटलचा प्रस्ताव सादर करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना यामध्ये लक्ष देण्याची विनंती केलेली आहे.
पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधले
केंद्रीय कामगार मंत्री यादव हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक कामगार संख्या, एमआयडीसीकडून उपलब्ध होउ शकणारी जागा, उत्तम पायाभूत सुविधा तसेच भौगोलिकदृष्ट्या बारामती हे मध्यवर्ती ठिकाण आदी बाबी त्यांच्या निदर्शनास आणून निवेदन दिले.





