Pune District : काळेवाडी-रुई रस्त्याचे निकृष्ट काम?

लोणी देवकर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदार संघातील इंदापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील सुरू असलेल्या काळेवाडी-रुई या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्या आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या रस्त्यावरून अनेक वाहनांची येजा होत असते. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात घडले होते. नुकतेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून लाखो रुपये खर्चून सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा सुरुवातीपासूनच खालावलेला असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
मात्र संबंधित अधिकार्यांनी आणि ठेकेदाराने कामाचा दर्जा सुधारण्यासाठी कोणतीच पावले उचलली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्याच्या अनेक निकृष्ट बाबी वापरण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रस्त्याच्या कामाबाबत इंदापूर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील उपअभियंता कोमल घोगरे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन ला उत्तर दिले नाही.
रस्त्याच्या साइडपट्टीला मुरुमाचा मुलामा
हा रस्ता घाई गडबडीत उरकून टाकण्याच्या बेताने रस्त्यावरच मुरूम टाकून संबंधित ठेकेदाराने कसलीही कमतरता ठेवली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर रस्त्याच्या साईड पट्टया भरण्यासाठी अवैध मुरूम वापरला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि महसूल विभाग यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.





