पुणे जिल्हा : राजकारणी लोकांनी शाळेकडे लक्ष द्यावे

इंदोरीकर महाराज : तळेगावात कीर्तनसेवेला गर्दी
तळेगाव ढमढेरे – आजची तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून पालकांनी मुलांकडे कटाक्षाने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. गावपातळीवर राजकारणी लोकांनी शाळेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिरूर हवेलीचे आमदार अशोक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे तसेच शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिरूर विधानसभा मतदारसंघात आमदार पवार यांचा वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण, अन्नदान, समाजिक समाज प्रबोधन, विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर तालुका कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांनी अनोखा उपक्रम सुरु करीत कीर्तनातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी इंदोरीकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तनासाठी तालुक्यातून विविध स्तरावरून मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते इंदोरीकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक माजी उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन व्याख्याते आकाश वडघुले यांनी केले.





