Pune District : घरफोड्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना

नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील चोरी व घरफोड्यांना आळा घालण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी आपल्या हद्दीत ‘स्मार्ट नारायणगाव, सुरक्षित नारायणगाव’ नावाने ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे जवान, पोलीस मित्र तसेच पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रुपच्या माध्यमातून दररोज रात्रीच्या वेळी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांना मार्गदर्शन केले जाते. पोलिसांनी ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पाटलांना बरोबर घेऊन दूचाकी व चारचाकी वाहनांच्या माध्यमातून सायरन वाजवत पेट्रोलिंग केली जाते. यावेळी सुरक्षित पुणे ग्रामीण ॲपचा वापर केला जातो.
गावात कोठेही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास सायरन वाजवून ग्रामस्थांना जागे केले जाते. बऱ्याचशा गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. हॉटेल्स व आस्थापना रात्री अकरा वाजता बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याने संशयिताना पकडणे पोलिसांना सोपे झाले आहे.
संशयास्पद व्यक्तीबाबत कळवा…
हॉटेल्स, लॉजेस, मोबाईल शॉपी मालक, भंगार विक्रेते तसेच सोनार यांच्याकडे संशयास्पद व्यक्ती मोबाईल, सोने, मोटरसायकल, मोटार पंप केबल किंवा शेतीचे साहित्य विक्रीसाठी आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार व यूट्यूब चॅनलच्या मदतीने नागरिकांना मौल्यवान दागिने, चोऱ्या, घरफोड्या याबाबत कोणती काळजी घ्यावी याचा प्रचार व प्रसार केला जात आहे.





