Pune district : भीमाशंकर येथील भाविकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस सज्ज

मंचर – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. चोरीच्या घटना होऊ नये .यासाठी कॅमेऱ्याची व्यवस्था केली असून वाढती गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दल सक्षम असल्याची ग्वाही पुणे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल्ल यांनी दिली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्याच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सोमवार दि.४ रोजी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भेट देत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेत अभिषेक करत यात्रेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत नवीन नायडू, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार,
श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड.सुरेश कौदरे, उपाध्यक्ष रत्नाकर कोडिलकर, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, सचिव अशोक काशिद, प्रमोद शिर्के, प्रशासकीय व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, व्यवस्थापक गोरक्ष कौदरे, पुजारी,संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सूरेश कौदरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा करत यात्रेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.त्यामुळे श्रावण महिन्याचे पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे. घोडेगाव, खेड पोलीस ठाण्याची पथके या ठिकाणी तैनात असून अधिकचा बंदोबस्त म्हणून बाहेरून देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण कसे राहील याबाबत चर्चा करून सूचना दिल्या आहेत. तसेच भाविकांच्या सोयी व सुविधांबाबत अध्यक्ष व संबंधित पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.





