पुणे जिल्हा : अवसरी खुर्द, बुद्रुकमध्ये पोलिसांचे पथसंचलन

अवसरी : आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक या गावांमध्ये निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे, शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मंचर पोलिसांच्या वतीने अवसरी खुर्द, बुद्रुक गावात पथसंंचलन करण्यात आले.
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएफ जवान, मंचर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांच्या वतीने गावाच्या मध्यवर्ती भागातून गावठाण, मुख्य बाजारपेठ या ठिकाणी पथसंचलन करण्यात आले. यावेळी अवसरी गावातील आठवडे बाजाराच्या औचित्य साधत भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली.
भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत मतदारांना मतदान करण्याबाबत जनजागृती केली. शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव व सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभातफेरी काढण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत मतदानापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा दबाव, बेकायदेशीर वर्तन करू नये, याबाबत सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक कंकाळ यांनी केले.





