पुणे जिल्हा: बेल्हे दरोड्यात चोरी गेलेले ३५ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द

बेल्हे – बेल्हे येथील माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या घरात दरोडा टाकुन ४९ तोळे चोरीला गेलेल्या पैकी ३५ तोळे दागिने आज आळेफाटा पोलिसांनी परत केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील बेल्हे (ता.जुन्नर) येथील माजी सभापती रामभाऊ बोरचटे यांच्या रहात्या घरात ६ अनोळखी दरोडेखोरांनी (दि.१९ डिसेंबर २०२२) रोजी पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवला आणि कपाटातील ४९ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४ लाख असा एकुण २८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला होता.
या बाबतचा गुन्हा आळेफाटा येथील पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता. हा झालेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक अंकीय गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलिस स्टेशन चे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील बडगुजर, सचिन काळे, नेताजी गंधारे, गणेश जगदाळे, तुषार पंदारे, दिपक साबळे, राजु मोमिन, विक्रमसिंह तापकीर, जनार्दन शेळके, सचिन घाडगे, योगेश नागरगोजे, चंद्रकांत जाधव, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, मुकूंद कदम, प्रमोद नवले, गायकवाड, पारखी, माळुंजे, ढोबळे यांची वेगवेगळ्या ठिकाणी पथके तयार करुन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचेना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळावर मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याची माहीती प्राप्त केली व गोपनीय बातमीदारांकडुन माहीती काढून नाशिक व मध्यप्रदेश या ठिकाणी एकाचवेळी छापेमारी केली. वासिंद ठाणे ग्रामीण येथून इंशाद नीम शेख (वय २८, रा. बो-हाडे मळा, पंचक जेल रोड, नाशिक रोड) व त्यांचे वडील नीम चांद शेख (वय५२) यांना ताब्यात घेतले. तर मध्यप्रदेश या ठिकाणी मोहम्मद हनीफ अल्ला बंदखान (वय ६२ पटेल नगर खाजराणा इंदोर) शुभंम रामेश्वर मालवीय (वय२४, रा.गादेशहा पिपालिया जि.देवासा) ,रहमान फजल शेख (वय३४ पंचम ॲव्हेन्यु जेल रोड नाशिक, लखन बाबुलाल कुंडलिया (वय ३० देवास रसलपुलखर) यांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या कडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली व हा चोरीला गेलेला माल आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या हस्ते बोरचटे यांच्याकडे देण्यात आला आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल पोलीसांनी परत मिळवून दिल्याने बोरचटे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.





