पुणे जिल्हा : आंबेगाव पूर्व भागात पेरणीची कामे सुरू

लोणी धामणी – संपूर्ण उन्हाळाभर उन्हाचे चटके सहन केलेल्या प्रत्येकासाठी मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. खास करून शेतकरी वर्ग आनंदात असून पावसाने उघडीप दिल्यास त्वरित शेतीची कामे सुरू होणार आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वळीव पावसामुळे शेतीची मशागत चांगल्या प्रकारे झाली आहे. तर गेली चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात चांगली होणार आहे. शेतकऱ्यांची देखील पेरणीची लगबग सुरू होणार असून बी बियाणांच्या दुकानावर गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
आंबेगाव पूर्व भागातील धामणी, पहाडदरा,शिरदाळे, लोणी, वडगावपीर परिसरात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकरी आनंदात आहेत. पाऊस जरी झाला असला तरी पाण्याचा आणि चाऱ्याचा अजून प्रश्न तसाच असून मुबलक पाणीसाठा होण्यासाठी मान्सूनच्या दमदार आगमनाची वाट शेतकरी पाहत आहे.
या वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.





