Pune District : गणेशोत्सवात शंभर झाडे लावा, सीसीटीव्ही बसवा

अशा मंडळांना भेटी देतील संदीपसिंग गिल्ल – प्रशांत ढोले
शिक्रापूर – गणेशोत्सव काळात शंभर झाडे लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या तसेच सीसीटीव्ही लावून सुरक्षिततेची दक्षता घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल स्वतः भेट देतील, अशी घोषणा गणराया अवॉर्ड स्पर्धेच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केली.
शिक्रापूर ठाण्याच्या हद्दीतील पत्रकारांनी २००७ साली दिवंगत माजी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गणराया अवॉर्ड स्पर्धेला सुरुवात केली होती. यावर्षी एकशे सत्तावन्न नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असून, नियमांचे पालन करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गणेशोत्सवाचे निकष ठरवले गेले असून, प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी फलक लावणे, जातीय सलोखा राखणे आणि डिजेच्या वापरावर पूर्ण बंदी पाळणे आवश्यक आहे. मंडळांनी बसवलेले सीसीटीव्ही उत्सवानंतर त्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी दान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
जे मंडळे शंभर झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन आणि सर्व नियमांची अंमलबजावणी करतील, त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल स्वतः भेट देतील, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.
गणराया आवार्डसाठी गिल शिक्रापूरात
गणराया अवॉर्ड या २००७ मध्ये सुरू झालेल्या परंपरेचे हे अठरावे वर्ष आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवानंतर पंधरा दिवसांत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल हे स्वतः शिक्रापूरात उपस्थित राहणार आहे.





