पुणे जिल्हा : वाघोलीसाठी मिळाली कायमस्वरूपी टोईंग व्हॅन

करण थोरात यांची माहिती; नागरिकांमधून समाधान व्यक्त
वाघोली : पुणे-नगर महामार्गावर ‘नो पार्किंग’मध्ये लावणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाघोलीसाठी कायमस्वरूपी टोईंग व्हॅन मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते करण थोरात यांनी दिली.
वाघोली येथे वाहनांवर कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने टोईंग व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली. टोईंग व्हॅन मिळताच बेशिस्त व ‘नो पार्किंग’मध्ये दुचाकी लावणार्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु केल्याने नागरिकांमधून कारवाईचे स्वागत होत आहे. दुसरीकडे टोईंग व्हॅन तात्पुरती मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत वाहतूक विभागाकडे दुचाकीसाठी टोईंग व्हॅन आणि चारचाकीसाठी टोईंग क्रेन कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करण थोरात व माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेवून वाहतूक विभागाकडून टोईंग व्हॅन कायमस्वरूपी देण्यात आली आहे.
लोणीकंद वाहतूक शाखेला टोईंग व्हॅन कायमस्वरूपी देण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी टोईंग क्रेन कायमस्वरूपी देणे सध्या शक्य नाही. परंतु जेंव्हा गरज पडेल त्यावेळी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल.
– सुनील गवळी, वाहतूक पोलीस निरीक्षक
नागरिकांच्या मागणीला यश मिळाले असून वाघोलीसाठी कायमस्वरूपी टोईंग व्हॅन मिळाली आहे. चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी गरज भासेल तेव्हा टोईंग क्रेन उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार असून कोंडीची समस्या देखील काही प्रमाणात कमी होईल.
– करण थोरात, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली
बेशिस्त दुचाकीवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन कायमस्वरूपी मिळाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. महामार्गावर बिनधास्त वाटेल तेथे चारचाकी वाहने लावून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी टोईंग क्रेन मिळावे यासाठी पाठपुरावा करणार आहे.
-राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली





