Pune District : पालेभाज्या, रानभाज्यांकडे लक्ष द्या

चिंबळी : शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य येण्यासाठी दैनंदिन उत्पादन आणि उत्पादनाच्या विक्रीतून उत्पन्न मिळवता आले पाहिजे यासाठी मागणी असणार्या पालेभाज्या आणि रानभाज्यांची सध्या महानगरात चांगली मागणी असून शेतकर्यांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत चिंबळी येथील प्रयोगशील महिला शेतकरी सीमा जाधव यांनी व्यक्त केले.
पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुले कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जाधव बोलत होत्या.
यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, कृषी महाविद्यालय,नंदुरबार सहयोगी अधिष्ठाता डॉ. होले, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, राहुरी विभाग प्रमुख डॉ. विजू आमोलिक, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विष्णु गरांडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास उपाध्ये व इतर मान्यवर उपस्थित होते.
सीमा जाधव यांनी शेतात रानभाज्यांबरोबरच विदेशी भाज्यांचा देखील प्रयोग करतात. विदेशी भाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ब्रोकली या भाजीची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. त्यांच्या शेतात सध्या तीन तीन प्रकाराच्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात असून त्याला देखील चांगला भाव मिळत असल्याचे त्यांनी उपस्थित शेतकर्यांना प्रयोग प्रात्यक्षिकासह दाखवून दिले.





