पुणे जिल्हा : तात्काळ उपचार मिळाल्याने वाचले रुग्णाचे प्राण

– डॉ. प्रीतम गाडे यांच्या प्रयत्नांनी बंद हृदय सुरू
मंचर – राजगुरुनगर विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले विकास देशमुख यांचे हृदय बंद पडले. त्यांना मंचर येथील सार्थक हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल करून त्यांच्यावर तेथील डॉ. प्रीतम गाडे यांनी त्वरित उपचार केल्याने देशमुख यांना जीवदान मिळाले. त्यांच्या कुटुंबीयांनी सार्थक हॉस्पिटल व डॉक्टरांचे आभार मानले.
विकास भाऊसाहेब देशमुख राजगुरुनगर विद्यालयात फिजिक्सचे प्राध्यापक असून त्यांना किडनीचा त्रास आहे. शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी रात्री अचानक त्यांना किडनीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ लागल्यावर ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी त्याचे कुटुंबीय घाबरले व पाहुण्यांना मित्रपरिवार यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यावेळेस त्यांच्या जवळच्या मित्रांनी देशमुख यांना तात्काळ सार्थक हॉस्पिटल मंचर येथे घेऊन जा त्यांच्यावर तिथे चांगले उपचार होतील, अशी कल्पना दिली.
देशमुख कुटुंबीयांनी देखील कुठलाही विचार न करता त्यांना तात्काळ मंचर येथील सार्थक रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे हृदय बंद पडले होते. त्यावेळी डॉक्टर प्रीतम गाडे, इतर डॉक्टरांनी तात्काळ त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवत कृत्रिमरित्या छातीवर दाब देवून पाच ते सात मिनिटाच्या अथक परिश्रमानंतर त्यांचे हृदय सुरू झाले. डॉक्टरांनी देशमुख यांची तपासणी केल्या असता त्यांना किडनीचा आजार होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच फिट येत होती, ऑक्सिजन लेव्हल कमी होती,
किडनीचा आजार असल्याने त्यांना युरिया, क्रियारिटी लेव्हल मोठ्या प्रमाणात वाढली होती. शरीरातील कचरा पाणी लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम किडनीद्वारे होत असते. हे काम बंद झाल्याने त्यांना डायलिसिसची अत्यंत गरज होती. बीपी कमी झाल्याने व डायलिसिस करायचे असल्याने त्यांच्यावर उपचार करणे अवघड होते. मात्र, दोन ते तीन दिवस डायलिसिस करून शरीरातील कचरा पाणी बाहेर काढण्यात आले. बीपी लेव्हल करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बुधवार दि.३० रोजी स्थिर झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार करून ते आता पूर्ण पणे बरे झाले असल्याचे डॉक्टरने सांगितले.
सार्थक हॉस्पिटल मंचर येथील डॉक्टर प्रीतम गाडे, डॉक्टर प्रशांत गाडे, तसेच स्टाफ यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे उपचार पद्धती मिळाली असून रुग्ण विकास भाऊसाहेब देशमुख यांच्यावर वेळेत उपचार झाल्यामुळे आमच्या रुग्णाचा पुनर्जन्म झाला.
– पत्नी सुनिता देशमुख, मुलगा विशाल देशमुख, राजगुरुनगर.





