पुणे जिल्हा : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर पॅचवर्क

* प्रभातचा दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे
* पाऊस थांबल्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे अधिका-यांचे आश्वासन
शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर मार्ग खड्ड्यात तर चाकण-शिक्रापूर रस्ता ब्लॉक या मथळ्याखाली दैनिक प्रभातमध्ये अनुक्रमे बुधवारी (दि. 24) आणि शुक्रवारी (दि. 26) प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले अन् हे खड्डे मुरमाच्या आणि खडीच्या सहाय्याने तात्पुरते बुजविले आहेत. तसेच कायमस्वरूपी खड्डे बुजविण्यासाठी त्या ठिकाणी खडी व क्रेशँड आणून ठेवली असून पावसाची रिमझिम कमी होताच ते खड्डे बुजवणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, तात्पुरत्या मलमपट्टी केल्याने स्थानिकांसह प्रवाशांनी प्रभातचे आभार मानले आहेत.
चाकण-शिक्रापूर महामार्गावर प्रवास करताना रासे, भोसे, शेलगाव, शेलपिंपळगाव, बहुळ आणि साबळेवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महामार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत असतो. शेलगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल सह्याद्री समोरील जीव घेणे खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली असून पावसाने उघडीप देताच कायमस्वरूपी मलमपट्टी केली जाणार आल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
तात्पुरती मलमपट्टी करून हा प्रश्न सुटणारा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर कायमस्वरूपीची उपाययोजना करावी असे मत खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष आवटे, शेलगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रवीराज झरेकर, विजयानंद आवटे, नवनाथ आवटे, दत्तात्रय हांडे, रामहरी आवटे, जयसिंग गरुड, उपसरपंच एकनाथ आवटे, राजाराम आवटे, कैलास आवटे यांनी व्यक्त केले.
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शेलगाव हद्दीतील रस्त्याची दुर्दशा झाली होती. शेलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पुरवठा करण्यात आला होता; मात्र त्या पत्राला कोणतंही उत्तर देण्यात आले नव्हते अखेर सलग दोन दिवस दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत तात्पुरती मलमपट्टी या रस्त्यावरती करण्यात आली आहे. दैनिक प्रभातचे शेलगाव ग्रामस्थांच्या वतीने आभार.
– वैशाली आवटे, सरपंच शेलगाव





