पुणे जिल्हा : उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रवासी समाधानी

राजगुरूनगर : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणार्या नाशिक फाटा ते खेड या 29.5 किमी अंतरावर हायस्पीड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी (दि. 2) ही घोषणा केली. या घोषणेमुळे पुणे, पिंपरी चिंचवड या शहरी भागासह उत्तर पुणे जिल्ह्यातील प्रवासी, वाहतूकदार यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना खेड तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी श्रेय दिले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, वाढती एमआयडीसी आणि त्यानुसार वाढत चाललेली वाहतूक याबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याला 2017 मध्ये यश आले. शरद पवार, नितीन गडकरी, स्व. गिरीश बापट यांच्या उपस्थितीत या मार्गाचे चांदणी चौकात झालेल्या कार्यक्रमात औपचारिक भूमिपूजन झाले होते. मात्र पिंपरी-चिंचवड महानगर पालिका प्रशासनाने मेट्रोचा आग्रह धरल्याने रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अडथळा आला.
आठ वर्षे लोकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार मोहिते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्तेत आल्यानंतर केंद्रांतून प्रत्यक्षात उतरवलेली ही कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह संसदेच्या आजी माजी पदाधिकारी यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.
आहे त्या चौपदरी मार्गाच्या रुंदीकरणाला मर्यादा येत होत्या. कॉरिडॉरमुळे जागेचे संपादन न होता, आठ पदरी मार्ग उपलब्ध होणार आहे. वाढीव खर्चाची जबाबदारी पेलण्यासाठी नितीन गडकरी यांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.
– दिलीप मेदगे, समन्वयक, पुणे-नाशिक महामार्ग





