Pune District : शिरूरमध्ये पार्किंगचा खेळखंडोबा; एचडीएफसी बँकेच्या पार्किंगसाठी रॅम्प की धोकादायक घाट

शिरूर : शिरूर शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः पाचकंदील चौकातील कापड बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अधिकृत पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लहान-मोठ्या गाड्यांची गर्दी वाढत असून वाहतूक कोंडी हा दररोजचा नित्यक्रम झाला आहे.
एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी पार्किंगची सोय केली असली, तरी तेथील रॅम्प बैलगाडा घाटापेक्षाही अधिक धोकादायक आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. प्रचंड चढ-उतार असलेल्या रॅम्पवरून गाडी काढणे म्हणजे मोठे आव्हानच ठरत आहे. चारचाकी वाहनांसाठी तर हा रॅम्प थरारपटाची’ अनुभूती देणारा असल्याची टीका होत आहे. समस्येच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष स्वप्निल रेड्डी, मनसे तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.
त्यांनी बँकेच्या पार्किंगमधून चारचाकी किंवा दुचाकी गाडी काढून दाखवा आणि रोख बक्षीस जिंका!” असे आव्हान दिले आहे. धोकादायक रॅम्पमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. पार्किंगव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बँकांचे तातडीने स्थलांतर करा
पाचकंदिल चौकात एचडीएफसी बँकेच्या खाली पार्किंगच्या जागेत चक्क पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शिरूर शाखा शिफ्ट होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे तातडीने भागातील बँका हलवण्याचे आवाहन परिसरातील व्यापाऱ्यांनी केलेले आहे.





