पुणे जिल्हा : पहाडदरा पाईप लाइनचे पाइप गेले चोरीला

लोणी धामणी : पहाडदरा (ता.आंबेगाव) येथील सार्वजनिक पाईप लाइनचे पाईपच अज्ञान चोरटयांनी चोरून नेल्यामुळे गेले तीन चार दिवस येथील सार्वजनिक पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या संदर्भात सरपंच मच्छिंद्र शिवराम वाघ यांनी सांगितले की, मेंगडेवाडी येथील डिंभे उजव्या कालव्या जवळ विहीर खोदून साधारण तीन ते चार किलोमीटर लोखंडी पाईपची पाईप लाईन केली होती.
ही सार्वजनिक पाणी पुरवठा योजना दहा टक्के लोकवर्गणीतून मंजूर झाली असून गावाला पाणी पुरवठा चालू होता. गेल्या दोन दिवसापूर्वी अज्ञान चोरट्यांनी पाळत ठेवून दहा फूटाचे दहा लोखंडी पाईप कापून नेले. त्यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या धावपळीत येथील ग्रामस्थांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
मुळातच या पाईप लाईनव्दारे पाणीपुरवठा होत असला तरी सरपंच आणि ग्रामस्थांच्या माहितीनुसार ही पाईप लाईन निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप केल्यामुळे अद्याप ग्रामपंचायतीने ही पाईप लाईन ताब्यात घेतली नव्हती. या अगोदर सुध्दा वर्षापूर्वी पहाडदरा- अवसरी बुद्रूक (हिंगे वस्ती) रस्त्यावरील संरक्षक लोखंडी गार्ड चोरटयांनी चोरून नेले. त्याचा अद्याप तपास लागला नसताना पाईप लाईनचे पाईप चोरीला गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली पाच दिवस या परिसरात रात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यातच हा चोरीचा प्रकार त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पाईप चोरीची व ड्रोनच्या घिरट्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच वाघ,उपसरपंच कैलास वाघ, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, ग्रा. प. सदस्य संकेत वायकर व येथील ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात व इतर कामासाठी शुक्रवार (दि.५) रोजी येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांची घोडेगाव येथे भेट घेऊन चर्चा केली.





