पुणे जिल्हा : …अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

खेड तहसीलदारांना आमदार मोहितेंकडून निवेदन
राजगुरूनगर : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व यात दोषी असलेल्या अधिकार्यांवर व ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे याना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीप्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आले. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, प्रदेश सदस्य डी. डी. भोसले, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, शहर अध्यक्ष सुभाष होले, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, सिद्धार्थ कांबळे, सागर सातकर, दिलीप बनसोडे, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, बबन शिवले, वभव घुमटकर, वैभव नाईकरे, काळुराम भोसकर, शुभम बालघरे, संतोष भांगे, विलास मांजरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्याबाबत कोणी खेळ करीत असतील तर ती अक्षम्य चूक आहे. पुतळा उभरताना त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पुतळा कोसळला. त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्याला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. या घटनेचा आम्ही खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करतो, असे त्यांनी नमूद केले.
सौजन्याने वागले पाहिजे
खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या वेळी आम्ही प्रत्यक्ष पाहायला नव्हतो. मात्र आपण लोकप्रतिनिधी आहोत. प्रशासन आणि जनतेशी बोलताना सौजन्याने वागले पाहिजे. आम्ही वाईट गोष्टींचे समर्थन करणार नाही, असे आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्ट केले.





