नीरा : सुशिक्षित बेरोजगारांसाठी कार्यशाळा व जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात खादी ग्रामोद्योग उपक्रमाअंतर्गत विविध व्यावसाय व कर्ज मार्गदर्शन करण्यात येणार असून हे मार्गदर्शन मोफत असणार असल्याची माहिती ऑल अबाऊट बिझनेस नीरा या संस्थेचे अध्यक्ष मंगेश ढमाळ यांनी दिली आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने युवकांनी उपस्थित रहाण्याचे आव्हान ढमाळ यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, पुणे व ऑल अबाऊट बिझनेस नीरा यांच्या वतीने रविवार दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी शासकीय योजना कार्यशाळा व जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP). मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP). मध केंद्र मधमाशापालन योजना याविषयी पुणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र, आय. डी. बी. आय. बँक, बारामती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, नीरा शाखा, एच. डी. एफ. सी. बँक व आय. सी. आय. सी. आय. बँक लोणंद शाखांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नीरा ग्रामपंचायत सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभिजीत वाडेकर व स्वप्निल बडबडे यांनी दिली.