पुणे जिल्हा : आमदार मोहितेंविरोधात विरोधक एकवटणार?

खेड-आळंदी विधानसभेसाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी
स्वाती झरेकर
शेलपिंपळगाव – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताधारी गटाला मोठा फटका बसला. सत्ताधारी महायुतीच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे, त्याअनुषंगाने राज्यात अनेक इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. यामध्ये खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची गर्दी वाढली आहे; मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात ही जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे अद्याप निश्चित नसले तरी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते यांनी 96 हजार मते मिळवूत तिरंगी लढतीत विजय मिळवला, त्यावेळी शिवसेनेचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांना तिरंगी लढतीचा मोठा तोटा सहन करावा लागला. तत्कालीन भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांना मिळालेली मते गोरे यांच्या पराभवाला कारण ठरली. शिवसेनेच्या या पराभवामुळे शिवसैनिक हे अतुल देशमुख यांच्यावर नाराज झाले. 2019 ला पुन्हा शिवसेनेचाच आमदार या तालुक्यात होऊ शकला असता; मात्र अपक्ष उमेदवार आल्याने मतांचे विभाजन झाले.
दरम्यान करोना काळात सुरेश गोरे यांचे निधन झाले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर भाजपबरोबर अजित पवार सत्तेत सहभागी झाले, यावेळी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले; परंतु मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेले मोहिते पाटील यांनी मात्र थेट वळसे पाटील यांच्यावर त्यावेळी उघड नाराजी व्यक्त केली. तरीही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय मोहिते यांनी घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना उच्चांकी मताधिक्य दिले. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
माझी शेवटची निवडणूक
2019 ची विधानसभा निवडणूक ही माझी शेवटची निवडणूक म्हणून मतदारांना भावनिक साद दिलीप मोहिते यांनी घातली निवडूनही आले; परंतु पुन्हा बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतः उमेदवार झाले आणि सर्वात कमी मतांनी मोहिते पाटील बाजार समितीच्या संचालक मंडळात पोहोचले. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली; मात्र तिथेही दिलीप मोहितेंना यू टर्न घेण्याची नामुष्की ओढवली. महाविकास आघाडीत असताना पंचायत समितीच्या प्रकरणात शिवसेना विरोधात घेतलेली भूमिका. या आणि अशा अनेक प्रकरणामुळे मोहिते पाटील यांची वाट अवघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सर्वपक्षीय इच्छुक
दिलीप मोहिते पाटील महायुतीचे आमदार असतानाही एकमेकांचे विरोधक राहिलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शवली आहे. एवढंच नाही तर महायुतीत असलेली शिंदेंची शिवसेनाही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. इकडे भाजपमधून नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झालेले अतुल देशमुख यांनी देखील उमेदवारीची अपेक्षा त्व्क्त केली आहे, तर याच पक्षातील नवीन चेहरा म्हणून सुधीर मुंगसे, आमदार दिलीप मोहिते यांना धक्का देत शरद पवारांच्या गोटात सहभागी झालेले रामदास ठाकूर हे देखील उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघावर प्रमुख दावेदार पक्ष म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील अमोल पवार आणि जोरदार तयारीत असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे यांनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
…तर अजितदादा विरुद्ध ठाकरे गट
दरम्यान पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक खेड, आंबेगाव, जुन्नर भागात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. किमान या तीन तालुक्यातून एका जागेवर तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा असणार आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत देखील जुन्नर, आणि खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातूनच सर्वाधिक मताधिक्य राहिले आहे. त्यामुळे खेड-आळंदीची जागा शिवसेना पक्षाकडे गेली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळू शकते.





