पुणे जिल्हा : महायुतीच्या योजनांविषयी विरोधकांकडून अपप्रचार

सहकारमंत्री वळसे पाटील : केंदूर, थिटेवाडीत गावभेत दौरा
केंदूर – राज्यातील महायुतीच्या सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना आणल्या आहेत. महिलांसाठी लाडकी बहीण, शेतकर्यांसाठी वीज बील माफी योजनांचा फायदा सध्या होत आहे. या योजनांची खिल्ली उडवून विरोधक योजना बंद पडणार असल्याचा अपप्रचार करत आहेत. या पुढील काळातही या योजना सुरुच राहणार आहेत, अशी ग्वाही सहकारमंत्री तथा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
केंदूर, थिटेवाडी (ता. शिरूर) परिसरातील गावभेट दौ-यात वळसे पाटील यांची कोपरासभा झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सविता प-हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे, चेतन दरेकर, सरपंच अमोल थिटे, रामशेठ साकोरे, प्रमोद प-हाड, गणेश प-हाड, सोमनाथ विधाटे, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर, केंदूर परिसरातील सुक्रेवाडी, शिळकवाडी, माळी मळा या परिसरातील मतदार उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, पुढील पाच वर्षांत आपल्याला केंदूर, थिटेवाडीसह या भागातील गावांचा पाणी व विजेचा प्रश्न सोडवायचा आहे. शेतकर्यांना दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. गेल्या 15 वर्षांत आपण या भागात विकासकामे मार्गी लावली आहेत. उर्वरित मला जनतेने पुन्हा साथ द्यावी, असे आवाहत त्यांनी केले. केंदूर, थिटेवाडी परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. वळसे पाटील यांनी वेळ नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून पाणीप्रश्न मार्गी लावला. भागातील रस्ते, सभामंडप, शाळा वर्ग खोल्यांची कामे मार्गी लागली असल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले.
केंदूर, थिटेवाडी परिसरातील पाणीप्रश्न केवळ दिलीप वळसे पाटील सोडवू शकतात. प्रशासनातील त्यांना प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे. शांत, संयमी नेत्याला मतदान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. गेल्या 12 वर्षां पूर्वीचा काळ पाहीला तर मोठा बदल झाला आहे. हा बदल वळसे पाटलांमुळेच झाला आहे, असे प्रमोद प-हाड यांनी नमूद केले.





