पुणे जिल्हा : पारगावात कांद्याची वखार खाक

गुऱ्हाळाच्या जळणाला आग : बारा लाखांचा फटका
पारगाव – दौंड तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी जालिंदर लक्ष्मण ताकवणे यांच्या गुऱ्हाळघराला जळण म्हणून वापरण्यात येणाऱ्या चोत्रीच्या मोठ्या दोन गंजीला आग लागली. गंजीसह काही अंतरावर असणाऱ्या कांद्याच्या वखारीचे यात नुकसान झाले आहे. ही घटना (दि.१) रोजी सकाळी १० वाजता घडली.
जालिंदर ताकवणे यांचा अनेक वर्षांपासून गुऱ्हाळघराचा व्यवसाय आहे. परंतु त्यांनी सध्या गुऱ्हाळ परप्रांतीयांना चालविण्यास दिले आहे. पावसाळ्याला सुरवात झाली असून गुऱ्हाळ चालकांना आता कुठे दोन पैसे मिळत असतात.
पावसाळ्यात जळणासाठी या चोत्रीच्या गंजी राखून ठेवण्यात आल्या होत्या. सहाशे पिशवी कांदा व दोन जळणाच्या गंजी असे मिळून दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुणे महानगरपालिकेचा वाघोली येथील आगीचा बंब व नंतर दोन जेसीबी यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. गावकामगार तलाठी रामेश्वर वेताळ यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.





