Pune District : बळीराजाला कांद्याने हसविले; किलोला 10 ते 30 रुपये दर

बेलसर : पुरंदर कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात रब्बी हंगाम 2024-25 मध्ये 6534.1 हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 7018.2 हेक्टर म्हणजेच 107.41 टक्के कांदा लागवड पेरणी झाली होती. काही दिवसापूर्वी हळवी कांदा काढल्यानंतर आता गरवी कांदा काढण्यासाठी शेतकरी लगबग करीत आहेत. दरम्यान, यंदा कांद्याला चांगला व समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. कांद्याला सरासरी 10 ते 30 रुपये किलोला बाजारभाव मिळत आहे.
इतर वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारभाव चांगला आहे. यामुळे शेतकरी लखपती होणार आहे.
तालुक्यातील वीर, परिंचे, माहूर, पिसर्वे, नायगाव, राजुरी, माळशिरस,कुंभारवळण, बेलसर, वाल्हे, वाघापूर, गराडे, दिवे, धालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांदा पीक घेतले जाते. मागील दोन दिवसात ढगाळ हवामान झाल्यामुळे शेतकर्यांची पळापळ झाली होती.
शेतातील कांदा लवकर बाजारात घेवून जाण्यासाठी शेतकरी लाल पिशवी आणि सुतुळी पिशवीत कांदा भरून राज्यातील पुणे, मुंबई, कोल्हापूर तर तर परराज्यातील मधुराई, मैसूर तसेच तीरची या ठिकाणी पुरंदर चा कांदा पाठविला जात आहे. पुणे मुंबई पेक्षा बेंगळुरु, कोल्हापूर, मदुराई येथे बाजारभाव जास्त मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
मी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात 12 एकर क्षेत्रावर गरवी कांद्याची लागवड केली होती.त्याची आता काढणी सुरू आहे. फुरसुंगी या वाणाची लागवड करून आतापर्यंत 1500 पिशवी कांदा बाजारात पाठविला आहे. यामधून अंदाजे 17 लाख रुपये उत्पन्न मिळाले असावे. अजून 5 एकर कांदा काढणी बाकी आहे.
– चंद्रकांत दिनकर काळाणे, शेतकरी धालेवाडीचौकट:- पुरंदर मधील कांदा चांगला गुणवत्तापूर्ण आहे.त्यामुळे परराज्यात आपल्या कांद्याला मोठी मागणी आहे.तालुक्यातील कांदा 15-30 रुपयांपर्यंत जागेवर खरेदी केला. बाजारभाव कमी-जास्त होत आहेत त्यामुळे खरेदी करताना शेतकर्यांना चांगला बाजारभाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– अतुल कुदळे, व्यापारी
बुधवारी (दि. 5) मिळालेला बाजारभाव
पुणे
आवक 15958 पिशवी
बाजार 14-26 रुपये प्रती किलो
कोल्हापूर
आवक 13115
बाजार 10-27 रुपये प्रती किलो
मुंबई
आवक 9486
बाजार 10-18 रुपये प्रती किलो





