Pune District : पूर्व हवेलीत कांदे काढणीला वेग

सोरतापवाडी : पूर्व हवेलीतील अनेक गावात कांदा काढणीला सुरुवात झाली असून कांद्याला बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी सध्याचा काळ खूप महत्त्वाचा असून कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे.
कांदा काढणीची लगबग शेतकरी करीत आहेत. त्यासाठी दिवसभर उन्हात कांदा काढणी चालू आहे. कांदा काढणीसाठी मजूर मिळवण्यासाठी शेतकर्यांना खूप कसरत करावी लागत आहे. सध्या बाजारभाव बर्यापैकी असल्याने शेतकरी तो बाजारात पाठविण्यासाठी घाई करत आहेत.
पूर्व हवेलीत कांदा काढणीच्या कामास वेग आला असून, शेतकर्यांनी काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यात सुरुवात केली आहे. तर काही शेतकर्यांनी कांदा काढून बाजारात पाठविण्यास पसंती दिली आहे. तर काही शेतकर्यांच्या शेतात कांदा काढण्याचे काम सुरू आहे. मजुरांकडून कांदा काढून तो पिशव्या मध्ये भरून शेतकरी आपला कांदा लगेच मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. कांदा हे शेतकर्यांचे नगदी पीक असून दराबाबत बेभरोसा आहे असे असताना सुद्धा पूर्व हवेलीत कांदा उत्पादन घेण्यावर शेतकर्यांचा कल वाढलेला दिसत आहे. कांदा उत्पादन घेताना शेतकर्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
त्यामध्ये महागडी रोपे, कांदा लागणीसाठी मजूर, खते, औषधे तसेच पाणी देताना भारनियमाच्या समस्येने शेतकरी ग्रासला आहे. त्यामुळे कांद्याला पाणी देणे अवघड जात आहे तसेच नवीन मुळा मुठा कालवा आटल्याने पूर्व हवेलीत दुष्काळी परिस्थिती जाणवू लागल्याने कांद्याला थोडे पाणी कमी पडल्याचे शेतकर्यांनी सांगितले. योग्य वेळीकांदा काढून तो बाजारात नेला तर शेतकर्यांना योग्य उत्पादन मिळेल तसेच मजूर टंचाईची सर्वात मोठी समस्या आहे. शेतकरी हवामानाचा अंदाज घेऊन कांदा काढणी करत आहेत. कारण कधी थंडी तर कधी कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे हवामान बघून व बाजारभाव योग्य असल्यामुळे पूर्व हवेलीतील अनेक गावात कांदा काढणी सुरू आहे.
यावर्षी कांद्याला चांगला बाजार भाव मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु वातावरणाच्या बदलाचा शेतकर्यांना फटका बसल्यामुळे शेतकर्यांना कांदा उत्पादन कमी मिळाले आहे.
-सुभाष कड, शेतकरी सोरतापवाडी





