पुणे जिल्हा : कोंढापुरीत वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरुर) येथे जेवणासाठी हॉटेलवर बस थांबल्यानंतर रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मण मारुती वरपे (वय ५५, रा. कुटेवाडी, जि. बीड), असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. कोंढापुरी येथील हॉटेल शिवार येथे रात्रीच्या सुमारास प्रवाशी वाहतूक करणारी बस थांबलेली असताना बसमधील लक्ष्मण वरपे हे बसमधून खाली उतरुन रस्ता ओलांडत होते.
त्याचवेळी अहमदनगर बाजूने आलेल्या वाहनाची वरपे यांना धडक बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत परमेश्वर हरिदास वाघ (रा. रायकर मळा धायरी) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.





