पुणे जिल्हा : योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

आमदार दिलीप वळसे पाटील यांची सूचना
घोडेगाव – आंबेगाव तालुक्यात पायाभूत सुविधांची कामे भरपूर करण्यात आली. परंतु शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनां भरपूर असून त्याचा लाभ अनेकांना मिळत नसल्याचे दिसून येते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यापर्यंत प्रत्यक्ष देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना माजी सहकार मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सोमवार दि. २३ रोजी केली.
आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घोडेगाव येथील पंचायत समिती हुतात्मा बाबू गेनू सभागृहात आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील झाली. यावेळी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, महावितरणचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर, मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी,
माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, आंबेगाव तालुका खरेदी संघाचे अध्यक्ष माऊली घोडेकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी बांधकाम, पाणीपुरवठा, मंचर उपजिल्हा रुग्णालय व घोडेगाव रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, लघुपाटबंधारे, शिक्षण, मंचर नगरपंचायत, पशुसंवर्धन इत्यादी विभागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक पंधरा दिवसांत विभाग निहाय बैठक होईल. आजच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचा आढावा पुढील बैठकीत घेतला जाईल. यासाठी आश्वासन देताना व माहिती सांगताना जबाबदारीने सांगा, अशा सूचना वळसे पाटील यांनी दिल्या.
शेतीसंदर्भातील कामे करा…
तसेच कातकरी, ठाकर, पारधी समाजाच्या कामांकडे विशेष लक्ष द्या, येणाऱ्या उन्हाळ्यात गाळ उपसा योजना राबवून बंधारे, तलाव आणि धरण यातील मोठ्या प्रमाणात माती उपसा संदर्भातील कामे घेतली जावी. यातील माती शेतकऱ्यांना हवी असेल तर ती देण्याची व्यवस्था करावी. तसेच विविध विभागांचे शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न कळवावेत. याचा पाठपुरावा करून कामे पूर्ण केली जातील. मंचर ग्रामस्थांसाठी मंचर नगरपंचायत हद्दीत नव्याने दवाखाना करण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी देखील शासनाकडे प्रयत्न करू असे वळसे पाटील यांनी सांगितले.





