पुणे जिल्हा : श्री कपर्दिकेश्वर चरणी चांदीचा मुकुट अर्पण

ओतूर येथे ढोल-ताशा, लेझीमच्या सुरात मिरवणूक
ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर यांच्या चरणी सौ व श्री प्रशांत माधवराव डुंबरे यांनी तब्बल अडीच ते तीन किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.
याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसह ढोल-ताशा, लेझीम पथक व सनईच्या मंजुळ सुरात वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, महेंद्र पानसरे, शांताराम पानसरे, सागर दाते, जितू डुंबरे, विश्वास डुंबरे, अमोल डुंबरे, दिनेश कर्डीले, विठ्ठल डुंबरे, श्रेयश डुंबरे, सचिन तांबे, अक्षय ढमाले, राजू डुंबरे, प्रकाश डुंबरे तसेच भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरवर्षी ओतूर ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात भरते. श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणार्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पहाण्यासाठी व दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक ओतूर येथे येतात.
श्रावणात प्रत्येक सोमवारी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात. हे जागृत देवस्थान मानले जाते. भाविक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर तांदळाच्या रुपाने नवस फेडतात. त्याप्रमाणे डुंबरे दाम्पत्याने चांदीचा मुकुट श्री कपर्दिकेश्वर चरणी अर्पण केला.





