पुणे जिल्हा : लोणी काळभोर परिसरात भक्तीचा महासागर

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्तीत विसावला
लोणी काळभोर –माऊली… माऊली… ‘ज्ञानोबा.. तुकाराम’ चा जयघोष, पालखीच्या पुढे मागे दिंड्या, तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सोबतीला आसमंतांत घुमणारा टाळ – मृदंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, अशा या भक्तिमय वातावरणात लाखो वारकर्यांसह पुण्याहून निघालेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विसावला.
पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज सकाळी पूजा झाल्यानंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेवून सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर कडे मार्गक्रमण केले. शेवाळेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताचा स्विकार करून सोहळा मांजरी फार्म येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.
मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील दुपारचा विसावा उरकून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोहोचताच, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखी व वारकर्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, उपसरपंच नासिरखान पठाण, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देविदास कदम, हभप सुरेश काळभोर, हनुमंत काळभोर, नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बीना काळभोर, प्रीतम गायकवाड, राजश्री काळभोर, विशाल गुजर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी स्वागत केले.
लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलच्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग व लेझीमच्या गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. प्राचार्य सीताराम गवळी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी वारकर्यांची वेशभूषा करून स्वच्छतेचे व साक्षरतेचे संदेश दिले. यावेळी नागरिकांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाक्यापासून पालखी तळापर्यंत चालत गेले. वाकवस्ती येथे पालखीचे साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, देविदास काळभोर, हृषिकेश काळभोर, गौरव काळभोर, मुकुल काळभोर व त्यांच्या सहकार्यांनी केले.
पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सात वाजण्याच्या सुमारास पोहचताच, पालखीचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळा मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहचली. पालखी तळावर आरती झाल्यानंतर लाखो वैष्णवांचा सोहळा विसावला.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व पंचक्रोशीतील नागरिकांनी वैष्णव भक्तांना एकादशी निमित्त स्वादिष्ट फराळाची व्यवस्था केली होती. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेते, विविध संस्था व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकर्यांसाठी चिवडा, बिस्कीट, फळे व फराळाच्या पदार्थांचे वाटप केले. पालखीत सहभागी झालेल्या वारकर्यांसाठी केमिस्ट असोशिएशनच्या वतीने मोफत जीवनावश्यक औषधे वाटप करण्यात आले.
संतपिठाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यात अनेक संस्थांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे हेची दान देगा देवा या शासनाच्या उपक्रमांतर्गत शाहीर प्रवीण जाधव यांनी जागरण गोंधळ घालून समाज प्रबोधन केले आहे. अनुभव शिक्षा केंद्राच्या तरुणांनी वारीतून संविधान जनजागृती केली आहे. तर चिखली (पुणे) येथील जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पांडुरंगाच्या भक्तीवर पथनाट्य सादर करून हजारो वारकर्यांची मने जिंकली.





