शिरूर : चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर आदेशानुसार गावात जाणाऱ्या रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला. सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा निर्माण केला. संबंधितांविरुद्ध शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंडल अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, दि. ११ जुलै रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, (दि.२५) रोजी दुपारी ३ वाजता ग्राम महसूल अधिकारी अनुजा घुगे, ग्राममहसुल सेवक प्रिती नानेकर, ग्राममहसुल अधिकारी रामदास आरदवाड, आदी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीनसह संबंधित जागेवर पोहोचले. तेव्हा पार्वतीबाई बबन उकिर्ड व त्यांच्या दोन्ही मुलांनी तसेच सुनांनी रस्ता खुला करण्यास आक्षेप घेतला. त्यांनी जेसीबी मशीनसमोर अडथळा निर्माण करत बकेटमध्ये बसून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. जर रस्ता खुला केला, तर आम्ही अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करू,” अशी धमकी दिली. पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस अंमलदार शरद वारे हे करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करत असताना न्यायप्रविष्ठ बाब नसताना जर कुणी तो अडवण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील. शेतकऱ्यांना शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे आपला शेतमाल त्यामुळे बाजारपेठेत नेता येत नाही. शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे याबाबत अर्ज करून रस्ता मिळवता येतो. – बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरुर.