Pune District : तुकडे बंदी कायद्याबाबत सूचना दाखल

पुणे जिल्हा मंचाचे महसुलमंत्र्यांना निवेदन
पाबळ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडे बंदी कायदा शिथील करण्याच्या अनुषंगाने अधिवेशनात घोषणा केलेली असून त्याकरीता एसओपी तयार करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. याबाबत 15 दिवसांत नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने मुंबईत मंत्रालयात पुणे जिल्हा विकास मंचाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष सदाशिव पवार यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले.
पुणे जिल्हा विकास मंच गेल्या 21 वर्षापासून तुकडे बंदी कायदा रद्द व्हावा यासाठी शासन दरबारी विविध स्तरावर सतत पाठपुरावा करीत असून तुकडेबंदी कायदा (दि.1) जुलैपर्यंत रद्द केल्याबद्दल मंचाच्यावतीने शिष्टमंडळाने महसुल मंत्री व शासनाचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी पुणे जिल्हा विकास मंचाचे शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
महसूल विभागामार्फत तयार करण्यात येणाऱ्या एसओपीमध्ये पुणे जिल्हा विकास मंचाच्या मागण्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी मंचाच्या वतीने केली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठवड्यात पुणे जिल्हा विकास मंचाबरोबर बैठक लावण्यासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा विकास मंचाचे अध्यक्ष सदाशिव पवार, सचिव कांतीलाल गवारे, उपाध्यक्ष राजेंद्र दणके, खजिनदार श्रीपतराव नवले, डॉ. मिलींद भोसुरे, ॲड. राजू राजुरकर, संदीप कुटे, पत्रकार गणेश लांडे, उद्योजक गणेश पाचुंदकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.





