Pune District : बारामतीत जिल्हा बँकेत रात्रीस खेळ चाले

माळेगावच्या निवडणुकीचे अर्थकारण उघड : अधिकारी, कर्मचारी पसार
विरोधकांकडून चौकशीची मागणी
बारामती – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती शहरातील आमराई भागातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत रात्री ११ वाजेपर्यंत सुरु होती. या ठिकाणी कारखान्याशी संबंधित मतदार याद्या, पैशांच्या वाटपाचे प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याने खळबळ उडाली. यावेळी पाटबंधारे खात्याचे क्लास वन अधिकारी पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. हा प्रकार अजित पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून केला आहे.
आमराई येथील जिल्हा बॅंकेची मुख्य शाखा बुधवारी (दि.१८) रात्री उशीरापर्यंत सुरु होती. ही माहिती मिळाल्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले. यावेळी तावरे यांनी निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मिळाल्या. बॅंकेतून मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप केला आहे.
तावरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे, मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे. मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले. माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचे काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करीत आहोत.
शासकीय यंत्रणेचा गैरवापर?
जलसंपदा विभागाचे अधिकारी यात सहभागी आहेत. ते बारामतीतच मुक्काम ठोकून पाणी वापर संस्थांवर दबाव टाकत होते. मदत केली नाही, त्यांचे पाणी बंद करण्याची धमकी दिली. निवडणुकीत अधिकाऱ्यांची भूमिका काय, असा प्रश्न विचारत तावरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. काही शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनाही निवडणुकीत कामाला लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे तावरे यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचे फुटेज आम्हाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.





