Pune district : शेतकरी केंद्रबिंदू ठेवून नवे उपक्रम राबविणार

सभापती शिंदे ः खेड बाजार समितीचा विक्रमी 9 कोटी 67 लाखांचा व्यवसाय
राजगुरुनगर – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील वर्षाचा व्यवसाय 9 कोटी 67 लाख रुपये इतका झाला असून हा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक व्यवसाय असून 4 कोटी 58 लाख रुपये वाढवा मिळाला आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या सभागृहात आज (दि. 30) झाली. यावेळी सभापती शिंदे बोलत होते. या सभेला खेडचे आमदार बाबाजी काळे, सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक कैलास लिंभोरे, अशोक राक्षे, जयसिम भोगाडे, विनोद टोपे, हनुमंत कड, कलम कड, रणजीत गाडे, सागर मुर्हे, महेंद्र गोरे, माणिक गोरे, अनुराग जैद, सयाजी मोहिते, सचिव बाळासाहेब धंद्रे,
यांच्यासह जिप माजी सदस्य अतुल देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भासले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोमवंशी, खेड पंचायत समिती माजी उपसभापती ज्योती अरगडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा भीमशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष विजय डोळस, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, माजी सभापती विनायक घुमटकर, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संजय घनवट यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी, शेतकरी, आडते, मापाडी आदी उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले, खेड -चाकण बाजारात अत्याधुनिक शौचालय बांधण्यात येणार आहे. शेतकर्यांच्या शेतातील माती परीक्षण करण्यासाठी अत्याधुनिक मशीनरी उपलब्ध केली जाईल. तालुक्यात भात शेती मोठी आहे. त्याबाबत एखादा मोठा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आहे बाजार समितीचा कारभार सुरु आहे. प्रशासन टापटीप काम करत आहेत. आगामी काळात शेतकर्यांचे पाणंद रस्ते, एक रुपयात जेवण, म्ब्युलन्स सेवा, शेतकरी केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत आदी महत्वपूर्ण उपक्रम सुरु केले जाणार आहेत.
हिरामण सातकर, नाना टाकळकर, सतीश राक्षे, अशोक बिरदवडे, बाळासाहेब शिंदे, दशरथ गाडे, मारुती सातकर, नरेंद्र थिगळे, शिवाजी मोरे यांच्यासह शेतकर्यांनी प्रश्न विचारले. यामध्ये बटाटा कोल्ड स्टोरेज, माती परीक्षण, शेतकर्यांसाठी अत्याधुनिक शौचालय, जेष्ठ नागरिकांना लिफ्टची सोय, कर्मचार्यांचा सन्मान, बाजार समितीमध्ये स्वच्छता, खेड बाजार समितीमध्ये ऑनलाइन मार्केट सुविधा आदी विषयांवर प्रश्न उपस्थित केले. प्रास्ताविक उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी केले. अहवाल वाचन सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी केले. संचालक अनुराग जैद यांनी आभार मानले. वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली.
बाजार समितीचा विकासाचा आलेख चांगला आहे, आताचे संचालक मंडळ आणि पूर्वीचे संचालक मंडळाची कामे चांगली असल्याने प्रगती झाली. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समिती आणि आमदार म्हणून मी प्रयत्न करील. शेतकर्यांची ही संस्था आहे तिचा विकास झाला पाहिजे त्यासाठी सर्व संचालकांची एकजूट असावी. तालुक्यातील पाणी आरोग्य कचरा आदी प्रलंबित प्रश्न शासन पातळीवर मांडले आहेत काही कामे सुरु आहेत काही प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा सुरु आहे.
-बाबाजी काळे, आमदार





