Pune District : माऊलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज

ग्रामपंचायतीसह सर्व यंत्रणा तयार
नीरा – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त नीरा नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महावितरण, जलसंपदा व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नीरा गाव पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नीरा नदीच्या काठावर असलेल्या पालखी विसावा स्थळावर निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.
गावात स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व वीज व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला आहे. नीरा ग्रामपंचायतीने गटारांची सफाई, पाण्याच्या टाक्यांचे निर्जंतुकीकरण तसेच दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी सावली व बॅरिकेट्सची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रास सूचना देण्यात आल्या असून गावातील हॉटेल्स व अन्नपदार्थांची तपासणी सुरू आहे. पालखी काळात पालखीतळाजवळ हिरकणी कक्ष व ओपीडीही सज्ज करण्यात आली आहे.
महावितरण विभागाने देखील चोख तयारी केली असून गावातील विजेच्या डी.पी.तील फ्युज बदलण्यात आले आहेत. विजेच्या झोळलेल्या तारांचे नियोजन करून वाकलेले खांब सरळ करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान अखंडीत वीजपुरवठा राहील, यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश काकडे यांनी सांगितले की, तुटपुंज्या निधीत सगळी कामं होत नाहीत, त्यामुळे निधीची वाट न पाहता ग्रामपंचायतीमार्फतच कामे केली आहेत. गावाच्या सौंदर्यीकरणासाठी पालखी तळाच्या भिंतींवर वारी दर्शनाचे चित्ररूप रंगविले आहे. दरम्यान, सरपंच तेजश्री काकडे म्हणाल्या की, मागील 15 दिवसांपासून संपूर्ण ग्रामपंचायत यंत्रणा वारकर्यांच्या स्वागतासाठी झटत आहे.
वाहतूक बदलामुळे पोलिसांची दमछाक
वाहतूक व्यवस्थेचा भाग म्हणून पोलीस यंत्रणेला विशेष पथक नेमावे लागले असून वाहतूक बदलांमुळे त्यांची दमछाक सुरू आहे. नीरा नदीच्या जुन्या पुलाकडे जाणार्या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले असून, रस्त्याच्या दुतर्फा कचरा कुंड्या, मोबाइल टॉयलेट व पाणी भरण्याची ठिकाणे उभारण्यात आली आहेत.





