पुणे जिल्हा : नारायणगाव आगाराची बस खिळखिळी

एसटी महामंडळाकडून प्रवाशांची सुरक्षितता टांगणीला
नारायणगाव – बहुजन हिताय, बहुजन सुखाय ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नारायणगाव आगारातील बस (एमएच 07 सी 7544) चा प्रवास अतिशय धोकेदायक झाला आहे. तरीही नारायणगाव आगारातून ही एसटी बस प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापरली जात असल्याने प्रवाशांची सुरक्षितता टांगणीला लागली आहे.
नारायणगाव आगारातील संबंधित एसटी बस रस्त्यावरून धावत असताना एसटी बसच्या दोन्ही बाजूचे पत्रे तुटलेले असल्याने वळणाच्या जागेवर बसमधील प्रवासी बाहेर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एसटी बसला निम्म्याहून अधिक ठिकाणी खिडक्यांना काचा नसून प्रवाशांना वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे प्रवासी प्रवास करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. एसटी बसचे पत्रे तुटलेले असून खिडक्यांना काचा नसल्याने प्रवासी भीतीच्या छायेखाली प्रवास करीत असतात. याशिवाय प्रवासात सुरक्षितता नसल्याने प्रवासी या बसमध्ये खिडक्यांच्या बाजूने बसण्यास तयार नसतात.
आगार प्रमुखांना नारायणगाव डेपोच्या एसटी बसची स्थिती माहीत असूनही खिळखिळी झालेली एसटी बस प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी का पाठवतात? असा प्रश्न निर्माण होतो. पुढील काळात वरील बस वाहतुकीसाठी रस्त्यावर फिरताना दिसल्यास प्रवासी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
लवकरच शाळांना सुट्टी लागून दिवाळीनिमित्त प्रवासी गावाकडे जाण्यासाठी बसच्या साह्याने प्रवास करतील. त्यावेळी नारायणगाव आगारप्रमुखांनी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही अशा एसटी बसेस वाहतुकीसाठी उपयोगात आणाव्या, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे.





