पुणे जिल्हा : नणंद-भावजयीने साजरा केला जल्लोष

भगिनी विजयाताई पाटील- सुनेत्रा पवार यांच्याकडून विजयोत्सव
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयात त्यांच्या भगिनी विजयाताई पाटील यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबाने साथ सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत विजयाताई पाटील यांनी अजित पवार यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच त्यांनी बारामतीत येऊन अजित पवार यांची साथ दिली.
सूक्ष्म नियोजन करीत बारामती शहरासह तालुक्यात वेगळी छाप पडली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी तसेच अनेकांचे मतभेद मिटविण्यात त्यांना यश आले. अजित पवार यांच्या विजयानंतर त्यांनी भावजय खासदार सुनेत्रा पवार यांना मिठी मारत आनंद साजरा केला. जणू काही बारामतीत केल्याच्या कामाची पावतीच त्यांना या मिठीत मिळाली असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.
राष्ट्रवादी तुम्ही फूट पडल्यानंतर अजित पवार त्यांच्या पत्नी सूनेत्रा पवार, मुले पार्थ पवार व जय पवार हे अजित पवारांचे कुटुंब एकाकी पडले होते. दुसरीकडे शरद पवार यांच्या पाठीशी संपूर्ण पवार कुटुंब उभा राहिल्याचे चित्र होते. त्यामध्ये अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार व त्यांचे कुटुंब देखील होते. लोकसभेवेळी अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांनी देखील पवार कुटुंबात ठाम भूमिका घेतली. त्या कोणाच्याही बाजूने गेल्या नाहीत.
विस्कटलेली घडी बसविली
विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवार एकटे असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांच्यावर अन्याय होत असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. त्यानंतर बारामतीत येऊन त्यांनी काही कामांची सूत्रे हाती घेतली. उत्तम पद्धतीने कामकाज केले. वेगवेगळ्या कमिट्यांच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या बारामती शहरात देखील काम करीत होत्या.
तालुक्यातील विस्कटलेली घडी बसवण्यासाठी अनेक महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यांनी काटेवाडी येथील बिरोबाच्या जत्रेत जाऊन देखील मतदारांना आवाहन केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या विजयात बहीणी विजयाताई पाटील, रजनी इंदुलकर यांची देखील योगदान आहे. नणंद- भावजयीने विजयानंतर प्रेमाने अलिंगण देऊन विजय साजरा केला.





