खेड तहसीलदारांविरोधात सुरू केले होते आंदोलन राजगुरूनगर : खेड उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर सुरेखा बाळु नाईकनवरे यांचे उपोषण दुसर्या दिवशी मागे घेतले. आंबेठाण (ता. खेड) येथील जमिनीच्या सातबारा उतार्यावरील दुरुस्ती (155 अंतर्गत) मागणी प्रकरण रद्द केल्यावरून तसेच त्या दुरुस्तीसाठी मध्यस्थांमार्फत लाच मागणीचा आरोप करीत त्या विरोधात वारसदार असलेल्या सुरेखा बाळु नाईकनवरे यांनी मंगळवारी (दि. 22) तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरोधात खेड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या आंदोलनात खेड तालुक्यातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांनी उपोषणकर्त्या सुरेख नाईकनवरे यांची आज भेट घेतली त्यांच्या समवेत नायब तहसीलदार रवींद्र मोरे उपस्थित होते. यावेळी उपोषणकर्त्या नाईकनवरे यांनी त्यांची बाजू मांडली. विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी अधिकारी दौंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, वंचित बहुजनचे तुषार गायकवाड यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी आरपीआयचे दिलीप नाईकनवरे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर, वंचितचे महेंद्र नाईकनवरे, सोनू काळे, हरीश कांबळे, बबलू गायकवाड, दत्ता गायकवाड यांच्यासह उपोषणकर्त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाची स्वतः कसून चौकशी केली जाईल. शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील. शासनाकडून चूक झाली की तुमच्याकडून झाली याचा शोध लावला जाईल. कढई पत्रकाप्रमाणे कसून चौकशी होईल. याचा अहवाल उपोषणकर्त्यांना दिला जाईल. याबाबत लेखी स्वरूपात दिले जाईल. उपोषण मागे घ्यावे. – अनिल दौंडे, उपविभागीय अधिकारी, खेड आंबेठाण येथील सुरेखा नाईकनवरे यांनी जमिनीच्या जुन्या सातबारा उतार्यावरील दुरुस्ती (155 अंतर्गत) अर्ज केला होता. त्यांच्याकडे पैशांची मागणी खासगी एजंटद्वारे करण्यात आली होती. दर तीन महिन्यांनी या प्रकरणाचा निकाल दिला जातो. पण तालुक्यात मात्र असे होत नाही. नाईकनवरे यांच्या विरुद्ध निकाल देऊन त्यांना त्रास देणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच उपोषणाला पाठिंबा दिला होता. – जयसिंग दरेकर, अध्यक्ष खेड तालुका, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी