पुणे जिल्हा ; नगर-कल्याण महामार्ग जुन्नरकरांना “टोल फ्री’

टोल प्रशासन स्थानिकांपुढे नरमले : आमदार बेनकेंची मध्यस्थी यशस्वी
ओतूर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडी येथील टोलनाक्यावर आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांना टोल द्यावा लागणार नसून तो तालुक्यातील रहिवासी असल्याचे ओळखपत्र दाखवून महमार्गावरून “टोल फ्री’ प्रवास करू शकरणार असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
डुंबरवाडी येथे तालुक्यातील ग्रामस्थांच्या वाहनांकडून अनेकदा टोलवसुली करण्यात येत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून या टोलवसुलीला स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते, अशा तक्रारी आमदार अतुल बेनके यांच्याकडे वारंवार येत होत्या. तसेच टोल प्रशासन व स्थानिक प्रवाशांत येथे नेहमीच हुज्जत होत होती. त्यामुळे आमदार बेनके यांनी डुंबरवाडी टोलनाक्यावर कार्यकर्त्यासह स्वतः जाऊन टोलनाका व्यवस्थापकांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जुन्नर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखविल्यानंतर टोल आकारण्यात येऊ नये अशी सूचना व्यवस्थापकांना केली व या सूचनेची लगेचच अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले. या सूचनेची दखल व्यवस्थापकांनी घेतली असून याबाबत त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिसद सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, उद्योजक जालिंदर पानसरे, प्रेमानंद अस्वार व स्थानिक कार्यकर्ते, वाहन चालक-मालक उपस्थित होते.
सुरुवातीपासूनच टोलनाका वादग्रस्त
मुळातच हा टोलनाका सुरू होण्यास डुंबरवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तर स्थानिकांना टोलवर रोजगार मिळेल या उद्देशाने व स्थानिक वाहनांना टोल वसुलीकरिता त्रास होणार नाही, अशा संकल्पनेतून अखेर हा टोल सुरू झाला. मात्र, सुरुवातीपासुनच वादग्रस्त ठरत आलेल्या डुंबरवाडी टोलनाक्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याने अखेर स्थानिकांना टोलमाफी देण्यात त्याची परिणीती झाली.





