Pune District : पैशांसाठी उसाच्या शेतात केला खून

शिरूर पोलिसांची केली काही तासात गुन्ह्याची उकल, दोघे आरोपी जेरबंद
शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणूण आरोपींनी उसाच्या शेतात खून करून मृतदेह लपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिरूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांच्या खुनाचा तपास काही तासांत उलगडत आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. सुनील उर्फ शैलेश सुखदेव मुळे व रमेश बारकू पवार (दोघे रा. फाकटे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, मयताचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहेत. मंगळवारी (दि.१९) सकाळी घराबाहेर पडलेले टेके रात्रीपर्यंत परतले नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता त्यांची दुचाकी कवठे येमाई – गांजेवाडी रस्त्यालगत उभी सापडली. तिथून अर्ध्या किलोमीटरवर उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. डोक्यावर व मानेवर गंभीर जखमा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
तपासात उघड झाले की, टेके यांनी आरोपींना दीड लाख रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्याने आरोपी संतापले आणि कट रचून लोखंडी रॉडने टेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर अंगावरील दागिने लुटून मृतदेह उसात लपविला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हवालदार सोनाजी तावरे, सागर बोऱ्हाडे व सहकार्याने पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील सरदवाडी येथील राजगड हॉटेल परिसरात छापा टाकला. यात दोन्ही आरोपी जेरबंद झाले.
या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक कारंडे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहभागी होती. सिसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल्सच्या सहाय्याने गुन्ह्याची उकल करून चार दिवसातच आरोपी गजाआड केले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.





