पिरंगुट – भोर विधानसभेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शंकर मांडेकर 20,108 अशा निर्णायक मतांनी विजयी झाले. मुळशी तालुक्यात झालेल्या मतदानामध्ये महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी अपेक्षेपेक्षा जास्त आघाडी घेतली. मुळशीकरांनी भरघोस मतदान करत मांडेकरांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भोर विधानसभेत मुळशी तालुक्यातून 1 लाख 26 हजार 607 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात विक्रमी असे 68.45 टक्के मतदान झाले. मुळशी तालुक्यातून महायुतीकडून रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांना 82,961 मते मिळाली. तर संग्राम थोपटे यांना 30,036 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार किरण दगडे यांना 13,258 एवढी मते तर दुसरे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांना 1528 मते मिळाली. 2024 ला आपल्या तालुक्याचा आमदार पाहिजे ही महत्त्वाची मागणी यावेळी पुढे आली होती. त्यातच शंकर मांडेकर यांना अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. मांडेकर यांना मुळशी तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या वीस वर्षांपासून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांचा दांडगा संपर्क आहे. याच दांडगा जनसंपर्क व वैयक्तिक करिष्म्यावर मुळशी तालुक्यातून त्यांनी 53 हजार मतांची आघाडी मिळाली. पोस्टल मतदानात आमदार संग्राम थोपटे यांनी बाजी मारली होती. मतमोजणीला आज मुळशी तालुक्यातून सुरवात झाली. पहिल्या फेरीपासूनच शंकर मांडेकर यांनी आघाडी घेतली. मुळशी तालुक्यात एकूण दहा फेर्या होत्या. या दहाही फेरीत मांडेकर हे आघाडीवर होते. 2019च्या तुलनेत संग्राम थोपटे यांना मुळशीत अपेक्षित असलेले मतदान झाले नाही. तर अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनाही अपेक्षित मते मुळशी तालुक्यात घेता आलेले नाही. तर गेल्या दोनवेळी विधानसभा लढविणारे कुलदीप कोंडे यांना तर अनेक बुथवर दोन अंकी मतदान झाले नसल्याचे पाहायला मिळाले. मुळशीकरांनी केला निर्धार, मांडेकर झाले आमदार मुळशीकरांना 2004 नंतर स्थानिक आमदार नव्हता. गेल्या तीन टर्म मध्ये संग्राम थोपटे यांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी मुळशीकर आमदार व्हावा ही तमाम मुळशीकरांची इच्छा होती. विशेषतः तालुक्यातील युवक व तरुण कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. त्यातच शंकर मांडेकर यांना अखेरच्या क्षणी अधिकृत उमेदवारी मिळाली. शंकर मांडेकर यांचा असलेला दांडगा संपर्क त्यांना उपयोगी आला. कोणताही पक्ष न पाहता केवळ माणूस म्हणून मुळशीकर नागरिकांनी शंकर मांडेकर यांना मतदान केले. अवघ्या पंधरा दिवसात महायुतीतील घटक पक्ष, विविध संघटना, तरुण, युवा कार्यकर्ते यांनी जोरदार प्रचार करत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.